बदलापूर. कोकणात व्हय महाराजा.. म्हणत होळीला ईडपीडा टळो..असे साकडे घालण्याची प्रथा आहे. बदलापुरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही असेच कोकणी स्टाईल गा-हाणे घालत कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत मनसेला सुयश मिळावे अशी प्रार्थना केली. बदलापूर पश्चिमेकडील सानेवाडी येथे मनसेच्या वतीने भ्रष्टाचाराची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. यावेळी मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी..व्हय महाराजा, म्हणत गारहाणे घातले. मनसेचे शहराध्यक्ष उमेश तावडे, महिला शहराध्यक्ष संगीता चेंदवनकर यांच्यासह मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत मनसेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून देण्याची बुद्धी बदलापूरकरांना दे महाराजा...असे गा-हाणे घातले. नगर परिषदेतील भष्ट्राचाराची होळी करून भ्रष्ट्राचाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा होऊ दे रे महाराजा.., अत्याचार करणाऱ्यांचा नायनाट कर रे महाराजा..असेही साकडे मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घातले. होळीभोवती रस्ते घोटाळा, पथदिवे घोटाळा, जंतुनाशक फवारणी घोटाळा, रेन वॉटर हार्वेस्टिंग घोटाळा, टीडीआर घोटाळा, आदर्श इको सॅनिटेशन घोटाळा, अंतर्गत लेखा परीक्षण घोटाळा, अग्निशमन सामुग्री घोटाळा असे विविध फलक लावण्यात आले होते.
भष्ट्राचाराची प्रतिकात्मकहोळी मनसेचे होळीला कोकणी स्टाईल गारहाणे